Saturday, June 2, 2007

प्रिय संदीप

प्रिय संदीप,

का कुणास ठाउक पण तुला कधी 'तुम्ही' म्हणावसं वाटलंच नाही. अगदी पहिल्यापासून. पहिल्यांदा तुझी कॅसेट तेंव्हाच वाटलं की काहीतरी वेगळं, नवीन ऐकतोय. आधी कधीही न ऐकलेलं. तू आमच्याच वयाचा आहेस हेच जाणवत होतं तुझ्या गाण्यांमधून. फारफार तर एकदोन इकडे तिकडे. असं वाटणं हेच कदाचित वेगळं असावं. आतापर्यंत कधीच कुठला कवी इतका आपल्याबरोबरचा कधीच नव्हता वाटला. तसं म्हणायला गेलं तर कवी आणि कविता असा संबंध फक्त परिक्षेत जोड्या लावण्यापलीकडे आलाच नाही. एक आकर्षण होते कवितेबद्दल. 'कणा', 'पितात सारे' अशा कविता खूप आवडल्यापण होत्या. पण खरी 'अनाम ओढ' लागली ती तुझ्या कॅसेट्स ऐकल्यानंतरच. पुण्यात असताना तुझी गाणी ऐकत जागवलेल्या त्या रात्री, त्यांचे प्रत्येकाला भावणारे अर्थ सांगत रंगलेल्या चर्चा आणि तुझ्या कविता 'डोक्यात' जाणाऱ्यांशी घातलेले वाद. सगळंच कसं नवीन होतं माझ्यासाठी. कधीच न अनुभवलेलं. एक वेगळं विश्वच खुलं झाल्यासारखं. शब्दहीन असलेली हिंदी पिक्चर मधली गाणी आणि english mediam मधल्या मुलांची मक्तेदारी असणारी इंग्लीश गाणी यांच्यामध्ये एक नवीन पर्याय मला उपलब्ध करून दिलास. तुझ्या बाजारात येणारी प्रत्येक कॅसेट विकत घ्यायचा निश्चयच केला मग.
थोड्याशा चुकामुकीमुळे तुझा एसेम मधला कार्यक्रम हुकला तेव्हा किती वाईट वाटलं होतं. तो कार्यक्रम जो हुकला तो असा की परत तशी संधी मिळायला दोन वर्ष जावी लागली. तेव्हा मात्र अगदी खूप खूप आनंद झाला होता. मुंबईत होणाऱ्या पहिल्याच काऱ्यक्रमाला येता आलं म्हणून. त्याआधी घेतलेलं तुझं पुस्तक अगदी आठवणीनं बरोबर आणलं होतं मी. पण त्याच्यावर सही घेताना वेगळेच दडपण आलं होतं. तिथे माझ्यासारखे बरेच लोक. आणि सगळेच तेवढेच उत्साही, तुझ्याबरोबर बोलायला, सही घ्यायला धडपडणारे. खूप आनंद पण झाला तुझे एवढे fan बघून. तुझी आणि सलीलची सही घेतली आणि एक वेगळाच आनंद घेउन campus मध्ये आलो. मग iitत झालेला कार्यक्रम. तो तर अविस्मरणीयच. तिकीटे खपवायला अगदी घरच्या कार्यासारखा राबत होतो. घेतलेल्या सगळ्या कष्टांचे चीझ झाल्यासारखे वाटले जेव्हा तुझ्याशी रुपेशने खास ओळख करून दिली. तुझ्याबरोबर मारलेल्या गप्पा. काढलेले फोटो. सगळे कसे अगदी कालपरवा घडल्यासारखे. मग ठाण्यातला कार्यक्रम आणि परवाचा 'मैतर'. त्यात बाकीच्यांमधलाच एक म्हणून वावरलास. कुठेही लोकप्रियतेचा जराही लवलेश नाही.
मग तुझ्या कवितांबरोबर बोरकर, मर्ढेकर यांच्याही कविता वाचू लागलो. त्यांच्या कवितांची पुल. आणि सुनीताबाईंची काव्यवाचने ऐकली. आणि एक नवीन मार्गच सापडला. जो कुठेतरी हरवला होता खूप आधी. कविता कळायला नाही पण कविता आवडायला नक्की लागल्या. एखादा प्रसंग किंवा अनुभव वाचलेल्या कवितेची आठवण करून देउ लागला. आणि एखादी कविता वाचताना हे असंच कधीतरी झालं होतं असंही कधीकधी वाटायला लागलं. एकदा मयुरेश म्हणाला होता मला 'वास येत नाही तर तू एका मोठ्या आनंदाला मुकलायस'. हे मुकलेले आनंद काय असतात ते आत्ता कळायला लागलंय. या पावसात चिंब भिजावं असंच वाटतं आता. आणि मग ते ओले पाय घेउन घरभर हिंडावं. आधी कधीच कसं नाही वाटलं असं?
घाबरू नकोस एवढे सगळे वाचून. तुला आदर्श वगैरे मानत नाही आहे मी. पण सुरवात या शब्दाला जितका अर्थ आहे तितके महत्व तुला नक्कीच. तुझ्या सगळ्याच कविता आवडतील असेही नाही आणि नाही आवडणार असेही नाही. पण पहिल्यावेळेची मजा ही वेगळीच. ती सर बाकी कुणाच्याच कविता वाचताना येणार नाही हे मात्र नक्की. मध्ये तू म्हटले होतेस कविता इतरांना आवडतात म्हणून सगळ्यांसमोर वाचतो, उद्या नाही आवडल्या तर स्वत:पुरत्या वाचेन. ही वेळ कधीच न येवो हीच प्रार्थना.
तुझा एक fan,
ओंकार.